अकलूज : माळशिरस नगरपंचायतीसाठी प्रशासकीय इमारत, मुख्याधिकारी निवासस्थान, पाणी पुरवठा योजना, अग्निशामक दल व इतर इमारती बांधण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अधीन असलेली माळशिरस येथील जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण खात्याच्या प्रधान सचिव कुंदन यांना दिल्या आहेत. मुंबई येथे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भेट घेऊन माळशिरसच्या जागा प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करून मागणीचे निवेदन दिले.
माळशिरस येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. मात्र तिचा कारभार ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतच चालत आहे. नगर पंचायतीच्या कामात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीसाठी सुसज्ज अशी नवीन इमारत, मुख्याधिकारी व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, पाणीपुरवठा योजना, अग्निशामक दल व इतर बाबींसाठी लागणाऱ्या इमारती बांधणे नितांत गरजेचे आहे.
माळशिरस शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे आवश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतीचे सध्याचे क्षेत्रफळ ३५ चौरस किलोमीटर आहे. या नगरपंचायती मधून पुणे-पंढरपूर, कोरेगाव-टेंभुर्णी हे महामार्ग जातात. अशा या महत्त्वपूर्ण केंद्रस्थानी असलेल्या नगरपंचायती साठी नवीन इमारत बांधण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. माळशिरस येथे गट क्रमांक २१०६ मधील महिला व बालकल्याण विभागाच्या अधीन असलेल्या जमिनीपैकी इमारतीसाठी जमीन मिळावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे. ठाकूर यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दाखवून महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
---मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांचा अहवाल तयार झाल्यानंतर येथील इमारतीसाठी लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा राहील.
- रणजितसिंह मोहिते-पाटील
विधान परिषद सदस्य
270721\1750-img-20210727-wa0015.jpg
मुंबई येथे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भेट घेवुन माळशिरस नगरपंचायतीसाठी जागा उपलब्ध करण्याविषयी चर्चा केली.