सोलापूरच्या खासदारांना तात्पुरता दिलासा; जात पडताळणीच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:22 PM2020-03-12T15:22:17+5:302020-03-12T15:24:19+5:30
पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश; बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाची ८ एप्रिल रोजी होणार पुन्हा सुनावणी
सोलापूर : लोकसभा निवडणूकीत बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केल्याचा, जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जात पाडताळणी समितीने पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर दि.८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
सोलापूर लोकसभा निवडणूक २0१९ मध्ये अनुसूचित चाती प्रवर्गातून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेड जंगम हा जातीचा दाखला सादर केला होता. हा जातीचा दाखला बोगस असल्याचा अक्षेप रिब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (पी.जी) चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता. समाज कल्याण विभागातील जात पडताळणी समितीने केलेल्या चौकशीत, बेडा जंगम हा जातीचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी जात पडताळणी समितीने अक्कलकोटचे प्रभारी तहसिलदारांना न्यायालयात फिर्याद देण्याच्या सुचना केल्या होत्या. प्रभारी तहसिलदारांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयात यावर सुनावली होऊन सदर बझार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशावरून सदर बझार पोलीस ठाण्यात भांदवि कलम ४२0, ४६५, ४६७, ३४ प्रमाणे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, तहसील कार्यालय उमरगा, जि. उस्मानाबादचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी, अक्कलकोटचे तहसिल कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्या विरूद्ध दि.५ मार्च २0२0 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. दि.११ मार्च २0२0 रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाकडुन युक्तीवाद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयास अंतरीम स्थगिती देवुन पुढील सुनावणी दि.८ एप्रिल २0२0 रोजी ठेवली आहे. या प्रकरणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडुन अॅड. प्रसाद ढाकेफाळकर, अॅड. संतोष न्हावकर, अॅड. महेश स्वामी, अॅड. अनुप पाटील, अॅड. महेश देशमुख यांनी तर तक्रारदारातर्फे अॅड. श्रीहरी अणे, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी काम पाहिले.
न्यायव्यवस्थेने संपूर्ण पुरावे पाहुन दिलेली स्थगिती ही खासदारांच्या बाजुने किती बळकट आहे हे दर्शवते. एकांगी आणि विरोधी बातम्या मिडीयाला पुरवुन एक खोटं चित्र तयार केलं गेलेलं होतं ते आता उघड पडलं आहे. खासदार महास्वामींची बाजू खरी आहे की खोटी हे दि.८ एप्रिलच्या सुनावणी दरम्यान कळेल.
अॅड. संतोष न्हावकर
मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयाला दि.८ एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच तपास चालुच राहणार आहे. दरम्यान जात पडताळणी समिती पुन्हा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करेल.
प्रमोद गायकवाड, तक्रारकर्ते