सोलापूर : साधारण रुपये तीन हजार कोटी प्रकल्प खर्च असलेल्या सोलापूर-धाराशिव या ८४ किमी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार ४५२ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा गुरुवारी दुपारी अर्थसंकल्पादरम्यान केली आहे. तसेच फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार एकूण प्रकल्प खर्चापैकी पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार देणार असल्याची माहिती अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सध्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गकरिता भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, साेलापूर ग्रामीण हद्दीतील सत्तावीस किलोमीटर रेल्वेमार्गाची संयुक्त मोजणी यापूर्वीच पूर्ण झाली असून, शहर हद्दीतील बाराशे मीटर मार्गाची मोजणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष असून, त्यामुळे प्रकल्पपूर्तीसाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गाला आता गती मिळणार आहे.