सोलापूर : एकीकडे देश अनलॉक होत असताना सोलापुरात मात्र पुन्हा थोडी नव्हे तर चक्क १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठविला आहे. सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ हे प्रशासन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे ‘पुनश्च स्टे होम’चा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.
महापालिकेची आरोग्य यंत्रणा विविध प्रकारच्या कामात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याला नागरिकांच्या निष्काळजीपणाबरोबरच प्रशासनही जबाबदार आहे. सुरुवातीपासून प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या असत्या तर कोरोनाला नक्कीच प्रतिबंध करता आला असता. परंतु सोलापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही साथ पसरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
पोलीस, जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य यंत्रणा हे सर्वच खाते गाफील राहिले. त्यात सोलापुरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग आहे, हेही कोणी लक्षात घेतले नाही. कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्यानंतर अधिकारी बदलले जात आहेत. महापालिकेच्या नवीन आयुक्तांचा चांगला प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना सोलापूर शहराची नेमकी माहिती घ्यावी लागेल. शहराची अर्थव्यवस्था आणि जनमानसाचा नेमका कानोसा घेता आला तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणता येईल.---------------प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली..शहरातील एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास या परिसराला तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र केले जात नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांना तत्काळ क्वारंटाईन केले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरणाचे काम तत्काळ होत नाही. नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले जात नसल्याचे सांगितले जाते. अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा अनेक अधिकाºयांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण, मृत्यू वाढत आहेत. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत. दुचाकीवर डबल सीट जाऊ नका म्हटले तरी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन फिरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. अनेक दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तोंडाला मास्क न लावता बसलेले असतात. त्या दुकानासमोर मोठी गर्दी असते. त्यामुळे आम्हाला पुन्हा लॉकडाऊन घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विनंती करूनही लोक ऐकायला तयार नसल्याने हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे. यासंदर्भात अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊन घ्यायचा प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत. - पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका