सोलापूर : केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर ॲमेनिटी कमिटीच्या सदस्यांनी सोमवारी सोलापूररेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. रेल्वे गाडीतील प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या दरम्यान स्थानकावरील जनता भोजन तयार करणाऱ्या कॅन्टीनला त्यांनी भेट दिली. जनता भोजनचा आस्वाद घेतला. बटाट्याची भाजी अत्यंत खराब आढळली. सदस्यांनी भाजी खाल्ली. तसेच सदर भाजी कॅन्टीन चालकालाही खायला दिले. कॅन्टीन परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने सदस्यांनी कॅन्टीनचा परवाना तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले.
या वेळी सदस्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना झापले. खडे बोल सुनावले. ग्राहकाभिमूख सेवा न दिल्याने कॅन्टीनवर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच जनता भोजनचे नव्याने टेंडर काढण्याचे आदेश यावेळी दिले. केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर ॲमेनिटी कमिटीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके, रवी चंद्रन, कैलास वर्मा तसेच स्थानिक सदस्य नरसिंग मेंगजी यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
डॉ. राजेंद्र फडके यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली. सोलापूर रेल्वे स्थानकासोबत अक्कलकोट रेल्वे स्थानक तसेच गाणगापूर रेल्वे स्थानकाचीही त्यांनी पाहणी केली. पाहणी दौरा नियमित होता. पाहणी दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवू, अशी माहिती या वेळी डॉ. फडके यांनी दिली.