दरम्यान, तालुक्यातील जवळा, घेरडी, महुद, वासूद, कोळा, यलमार, मंगेवाडी, नाझरे,जुनोनी, हातीद,वाकीशिवणे, कडलास या गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधीचा कस लागणार असल्याने निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.
सांगोला तालुक्यात ६१ पैकी पाच ग्रामपंचायती व ६९ जागा बिनविरोध झाल्याने ५६ ग्रामपंचायतींच्या ६०४ जागेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक सहसा पक्ष पार्टीवर न होता स्थानिक आघाड्या करून नातीगोती, हितसंबंध, मैत्री, कोण कोणाच्या मदतीला धावून आले. वैयक्तिक हेवेदावे यावरच होत आल्याचे आजवरच्या निवडणुकात दिसून आले आहे.
तालुक्यात शेकापक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची सहकारी संस्थांसह बहुतांशी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आहे. मागील ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी (युती) होती; मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना उमेदवाराला दिल्यामुळे अनेक वर्षांची युती संपुष्टात आली आहे.
----- नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत शेकाप बहुतांशी ग्रामपंचायती स्वबळावर लढवीत असून, काही गावात स्थानिक आघाड्यासोबत आहे तर राष्ट्रवादी काॅँग्रेस शिवसेना काँग्रेस (आय) यांची महाविकास आघाडी असून, काही ठिकाणी स्थानिक युती आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जात आहे. ५६ ग्रामपंचायतींपैकी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या जवळा, कोळा गटाचे झेडपी सदस्य ॲड. सचिन देशमुख व माजी सभापती संभाजी अलदर, वासूद भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार विरुद्ध शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची महाविकास आघाडी, महुद राष्ट्रवादी काॅँग्रेस पार्टी- शिवसेना व शेकाप -शिवसेना, नाझरे शेकापविरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, हातीद शेकाप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, यलमार मंगेवाडी शेकाप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कडलास शेकाप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, घेरडी शेकाप विरुद्ध रासप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस - शेकाप, माजी सभापती बाळासाहेब काटकर यांचे वाकी शिवणे गावात शेकाप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी काॅँग्रेस यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
----जवळ्यात लक्षवेधी लढत---
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे जवळा ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून वर्चस्व असून, या ठिकाणी प्रतिस्पर्धी भाजपचे श्रीकांत देशमुख व शशिकांत देशमुख या दोघा बंधूंनी पॅनल उभे करून आव्हान दिले आहे तर वासूद ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून शेकापचे वर्चस्व आहे. यंदा मात्र भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी पॅनल उभे करून शेकाप -राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.
-----