लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ लढा हा काही पुजाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाच्या विरोधातील लढा नव्हे; तर ती धार्मिक क्षेत्रातील सुधारणावादी चळवळ आहे; म्हणून तिला पुरोगामी हिंदूंनी बळ दिले पाहिजे, असे आवाहन निवृत्त प्राचार्य टी. एस. पाटील यांनी गुरुवारी येथे केले. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, यासाठी सरकारवर दबाव आणावा म्हणून काढण्यात येणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, महापौर हसिना फरास, मेघा पानसरे, आदींसह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते भरपावसातही या फेरीमध्ये सहभागी झाले. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात हा ‘मॉर्निंग वॉक’ काढला. या फेरीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जवाब दो’आंदोलनाची सुरुवात झाली.टी. एस. पाटील म्हणाले, ‘पुजारी हटाओ समितीत पानसरे विचारांची माणसे घेऊ नका, अशी मागणी तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी केल्याचे वाचनात आले. हे लोक आपल्याकडेच साऱ्या हिंदू धर्माचा ठेका असल्यासारखे वागत आहेत. आम्हीही हिंदूच आहोत; परंतु आम्ही पुरोगामी हिंदू आहोत. आम्हाला महात्मा फुले यांचा वारसा आहे. त्यामुळे आपला लढा सनातनी हिंदूंविरोधातील आहे. ज्यांना धर्माच्या नावावर शोषण करायचे आहे, मंदिरातील गाभारा हा ज्यांना स्वत:च्या मालकीचा वाटतो, त्यांनाच पुजाऱ्यांना हटवा म्हटल्यावर वाईट वाटू लागले आहे. डॉ. दाभोलकर यांनी धर्मातील मानसिक गुलामगिरी मोडून काढण्यासाठी प्राण वेचले. पानसरे-कलबुर्गी यांची आहुती ही अशाच सुधारणांसाठी झाली आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील आंदोलन हे याच परंपरेतील आहे.’ राज्य सरकारकडे इच्छाशक्ती असती तर त्यांनी पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना यापूर्वीच पकडले असते; परंतु सरकार ढिम्म आहे म्हणून आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. पानसरे यांचे स्मरण कायम राहावे यासाठी महापालिका त्यांचे स्मारक उभारत असून त्या कामाला गती दिली जाईल, असे महापौर फरास यांनी सांगितले. शाहीर राजू राऊत व राजू पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मरणार्थ ‘माझी मैना गावाकडं राहिली...’ ही लावणी गायिली. महापौरांनी प्रत्येक मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी व्हावे अशी सूचना सतीश पाटील यांनी केली. यावेळी उदय नारकर, सुनील सरनाईक यांचीही भाषणे झाली. बी. एल. बरगे यांनी समारोप केला. या फेरीमध्ये दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, नामदेव गावडे, नगरसेविका वनिता देठे, संतराम कांबळे, अर्जुन तारळेकर, रवींद्र राऊत, रमेश वडणगेकर,उमेश पानसरे, सुनील माने, रमेश वडणगेकर, सीमा पाटील, सीमा कांबळे, संघसेन जगतकर, अनिल चव्हाण, आदी सहभागी झाले.एन. डी. सरांची चिकाटीप्रा. एन. डी. पाटील यांचे सध्या ८९ वे वर्ष सुरू आहे. एक पाय अधू आहे. किडनी काढली आहे. हृदयविकाराचाही त्रास आहे; परंतु तरीही २० तारखेचा ‘मॉर्निंग वॉक’ त्यांच्याकडून कधीच चुकत नाही. गुरुवारी सकाळी पाऊस मी म्हणत असतानाही ते सगळ्यांत उपस्थित होते.
‘पुजारी हटाओ’ धार्मिक सुधारणावादी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:36 AM