अक्कलकोट : कुरनूर येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पिकांना टाकण्यासाठी आणून ठेवलेले रासायनिक खत चोरट्याने पळविले. या घटनेनंतर अक्कलकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याबाबत शेतकरी ऋषिकेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. शेतातील पिकांसाठी सिंदखेड येथील आदर्श कृषी भांडार यांच्याकडून ५ जुलै रोजी ४५ किलो वजनाचे ७ पोते युरिया खत, ॲग्रीपॉवर २५ किलो, सुपर ५० किलो अशी २७ पोती खत आणून ठेवले होते. ते पावसाने भिजू नये म्हणून त्यावर ताडपत्री टाकली होती. दरम्यान, खताची सर्व पोती चोरीला गेली. संशयित आरोपी लक्ष्मण शिवराम कांबळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१६ जुलै रात्री ते १७ जुलै दरम्यान ही चोरी झाली आहे. घटनास्थळी तपासी अंमलदार फिरोज मियावाले व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कलशेट्टी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.