राकेश कदमसोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या एका टोकावरचं साखरेवाडी गाव. या गावचे सरपंच जयवंत भगवान क्षीरसागर एक पुणेरी सोलापूरकर आहेत. २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते आरक्षणामुळे साखरेवाडीचे सरपंच झाले. पुण्याच्या हडपसर भागात त्यांचे घर आहे. पत्नी अनिता आणि दोन मुलांसमवेत ते राहतात. तिथे बिगारी काम करतात. हडपसर ते साखरेवाडी अशी त्यांची जगण्याची नवी संघर्षकथा सुरू आहे... ती त्यांच्याच शब्दांत...
साखरेवाडीत आमची सहा एकर शेती हाय, पाणी हाय पण भांडवल नाय. उन्हाळ्यात तर पाणीच नसतं. १९ वर्षांपूर्वी गाव सोडून उपजीविकेसाठी पुण्यात गेलो. गावचा टच होताच. तीन वर्षांपूर्वी गावातले नातेवाईक घरी आले... म्हणाले दादा तुला इलेक्शनमध्ये उतरावं लागेल. आरक्षणानं गावाचा सरपंच झालो, पण उपजीविकेचं काय? पुण्यातलं काम तसंच सुरू ठेवलं. हडपसर, सासवड, गंगानगर इथं बिगारी कामं घेतो.
आठवड्यातले तीन दिवस पुण्यात आणि चार दिवस गावाकडं... नुसती धावपळ. गाव छोटं असल्यानं सरपंचाला ५०० रुपये मानधन मिळतं. गेल्या तीन वर्षांत ते सुद्धा मिळालं नाही. गावचा सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा १४ घरकुले मंजूर करुन घेतली. ही माणसं कुडाच्या घरात राहत होती. या घरकुलाच्या मंजुरीसाठी किती अन् कशा फेºया मारल्या माझ्या मलाच माहीत आहेत. पुण्यातून रविवारी रात्री गावात येतो. सोमवारी सकाळी झेडपी, पंचायत समितीत काम असतं. सकाळी ७.३० वा. एसटी येते. सकाळी जेवण जात नाही मग चहा पिऊनच बाहेर पडतो. ९ वाजता पोहोचलो की साहेब लोकांची वाट पाहण्यात ११ आन १२ कधी वाजले कळत नाही. कधीकधी दिवसभर उपाशी राहतो. रात्री ७ च्या एसटीने गावात येतो.
पुण्याला जाताना कसा जातो आन येताना कसा येतो ते सांगू शकत नाही. रात्री-अपरात्री मिळल ते वाहन पकडून धावपळ सुरु असते. परवा विचार आला होता की हे सरपंचपद सोडून द्यावं. पण आमचे लोक म्हणाले राहू दे आणखी दोन वर्षे तर राहिली आहेत. पुन्हा जोमानं कामाला लागलो. राजकारणात आमची ताकद हाय. परवा गावची पाण्याची मोटर जळाली. ग्रामपंचायतीकडे लय निधी नाही. त्यामुळं स्वखर्चातून ती नीट केली. आजवर कुणी काम केलं नाय तेवढं गावात केलंय. लोक राजकारण करतात. करणाºयालाही कामं करु देत नाही. मी गावाकडचं लक्ष तुटू देत नाय. पुण्यातून येताना पुतण्याकडं सगळं काम सोपवून येतो. पत्नी अनिता ही सुद्धा काम करते. तिच्यामुळं कुटुंबाला हातभार लागतो. मुलाचं शिक्षण होतं. सोलापुरात कामाच्या साइट नाहीत. इथं काम मिळालं असतं तर पुण्यात गेलोच नसतो.