रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : जिल्ह्यासह नजीकच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या संजीवन समाधी म्हणजेच योग समाधीवर चार गजराजांची प्रतिकृती उभी केली आहे. गजराजांसह योग समाधीचा परिसर ६ क्ंिवटल आकर्षक फुलांनी सजावण्यात आला आहे. पुण्याच्या १० कलाकारांनी गजराजांची प्रतिकृती साकारली आहे तर भारत फ्लॉवर स्टॉलच्या २० कलाकारांनी त्यावर विविधांगी फुलांची जोड दिली आहे. सजावटीत या वीसही मुस्लीम कलाकारांचे चांगलेच हात लागले आहेत.
शुक्रवारपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला. सोमवारी श्रावणातला पहिला सोमवार. प्रत्येक सोमवारी योग समाधीची आकर्षक सजावट करण्याची परंपरा आजतागायत आहे. यंदा चार श्रावण सोमवार आले असून, उद्याच्या योग समाधीच्या आकर्षक फुलांची सजावट करण्याचा मान प्रथेनुसार शेळगीचे श्री सिद्धरामेश्वर भक्त राजशेखर बिराजदार-पाटील यांना मिळाला. यंदा योग समाधीची वेगळी सजावट करण्याची संकल्पना त्यांना सुचली. त्यांनी ही संकल्पना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीसमोर मांडली. कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह सदस्यांनी ही संकल्पना उचलून धरली. विविधांगी आकर्षक फुलांच्या सजावटीचे काम २ आॅगस्टपासून हाती घेण्यात आल्याचे भारत फ्लॉवर स्टॉलचे मंजुनाथ तेलसंग यांनी सांगितले. सजावटीसाठी लाल अन् पिवळा झेंडू, पांढरी शेवंती, कार्लेसन, आर्किड आदी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
महादेवाच्या पिंडीवरील शेषनाग- योग समाधीवर आकर्षक मेघडंबरी उभी करण्यात आली असून, चारही बाजूने गजराला आकर्षक फुले अन् सजावटीच्या साहित्यांनी सजावण्यात आले आहे. योग समाधीला फेºया मारणाºया प्रत्येक भाविकाला गजराजाचे दर्शन तर घडतेच. शिवाय मधोमध महादेवाच्या पिंडीवरील शेषनागाचे दर्शनही घडणार आहे. पुण्याच्या सागर रावडकर, शकील शेख, सुजित परदेशी, संतोष जाधव आदींनी ही सेवा बजावली आहे. उद्या (सोमवारी) नागपंचमीचा उत्सव असल्याने या सजावटीला विशेष महत्त्व असणार आहे.
वयोवृद्ध, अपंगांसाठी व्हील चेअरद्वारे दर्शन- संपूर्ण श्रावण महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषत: श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मंदिर परिसरात भक्तीसागर उसळलेला असतो. अंध, अपंग अन् वयोवृद्ध भाविकांचा विचार करुन यंदा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने संमती कट्टा परिसरालगत असलेल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर व्हील चेअर ठेवण्यात आले आहे. एखादा अपंग, अंध अथवा वयोवृद्ध भाविक कुटुंबासमवेत आला तर त्याला कुटुंबातील सदस्यांनी व्हील चेअरवर बसवून योग समाधीपर्यंत दर्शनासाठी नेता येते.
दिवसेंदिवस श्री सिद्धरामेश्वर भक्तांची गर्दी वाढत आहे. बालगोपाळांपासून ते आबालवृद्ध दर्शनासाठी येताना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने त्यांच्या सुकर अन् सुलभ दर्शनाचा विचार केला आहे. अंध, अपंग, वयोवृद्ध भक्तांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सहा ते आठ सीटर इलेक्ट्रिक वाहन आणण्याचा प्रस्ताव आहे.-सिद्धेश्वर बमणी, सदस्य, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.
गेल्या अनेक वर्षांपासून योग समाधीस आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम भारत फ्लॉवर स्टॉलच्या माध्यमातून होत असते. इथे काम करणारे बहुतांश कलाकार हे मुस्लीम आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा मुस्लीम कलाकारांनी जोपासली आहे. एक प्रकारे ग्रामदैवताची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते.-जाकीर चौधरीकलाकार, भारत फ्लॉवर स्टॉल