सोलापूर : समाजात लोप होत असलेली वाचन संस्कृती टिकविण्याचा, संवर्धन करण्याचा प्रयत्न के. एल.ई. सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी शाळा करत आहे. यासाठी रोज एक तास हा वाचन तास म्हणून घेतला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर बाबींचे ज्ञान मिळावे यासाठी हा प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतो.
शाळेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी शिक्षकासह ग्रंथालयात वाचनासाठी येतात. या तासाला विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, विस्डम चंपक, छोटू यासारखी मासिके तसेच मनोरंजनात्मक छोट्या गोष्टींची पुस्तके, महापुरुषांची चरित्रे, विज्ञानावरील, ऐतिहासिक व स्पर्धात्मक अशी विविध माहितीची पुस्तके दिली जातात. विद्यार्थी त्यांना आवडेल ते पुस्तक घेऊन त्याचे वाचन करतात. वाचन तास या उपक्रमातून वाचन साहित्याचा लाभ घेणाºया विद्यार्थ्यांमधून दोन विद्यार्थी, दोन विद्यार्थिनी याप्रमाणे चार विद्यार्थ्यांना ‘वाचकवीर’ हा पुरस्कार दिला जातो.
प्रशालेच्या ग्रंथालयाकडून ग्रंथालयाचे जनक एस.आर. रंगनाथन जयंती, अब्दुल कलाम यांची जयंती, मराठी भाषा गौरव दिन पुस्तक प्रदर्शन भरवून साजरा करण्यात येतो. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांविषयी माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम प्रशालेत घेण्यात येतात. उपक्रम राबविण्यासाठी पालक-शिक्षक संघटनेतर्फे पुढाकार घेतला जातो. या उपक्रमाला के़ एल.ई.संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधू काडादी यांच्यासह पर्यवेक्षिका सुरेखा म्हमाणे, ग्रंथपाल करुणा शिंदे व प्रशालेतील शिक्षक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभते.
महिला सुरक्षा समिती- मुलींना शाळेत व शाळेबाहेर येणाºया अडचणीपासून वाचवण्यासाठी प्रशालेत महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना येणाºया अडचणी, त्रास देणारी मुले यांची तक्रार करायला मुले घाबरत असतात. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:चे नाव न लिहिता त्रास देणाºयाचे नाव व त्रासाचे स्वरूप लिहून ती चिठ्ठी तक्रार पेटीत टाकतात. ही तक्रारपेटी सर्वांसमोर उघडली जाते. मुख्याध्यापक त्रास देणाºया विद्यार्थ्यास बोलावून समज देतात व त्या चिठ्ठीतील प्रश्नांचे निरसन करतात. याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर केल्या जातात.
वाचन संस्कृती संवर्धन करण्याचे कार्य शाळेतील ग्रंथालय करत असते. क्रमिक पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा भागविणे गरजेचे आहे. त्यांच्या अवांतर वाचनात भर पडावी, बालपणापासूनच वाचनाची आवड लागावी म्हणून प्रशालेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात.-अनिल पाटील, मुख्याध्यापक, अण्णप्पा काडादी शाळा