सांगोला : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकून जेसीबीने अवैधरित्या ओढ्यातून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चोरून वाळू भरत असताना पकडले़ यावेळी पोलीस अन् अवैध वाळू उपसा करणाºयांमध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांनी नऊ पैकी चौघांना अटक केली असून जेसीबी, ट्रॅक्टर, डंपिंग ट्रॉली, वाळू असा सुमारे २० लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल सांगोला पोलीसांनी जप्त केला आहे. ही घटना चिंचोली (ता. सांगोला) येथील मानेवस्तीलगत असलेल्या ओढ्याजवळ घडली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या खबरीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हनुमंत माळकोटगी, पोलीस नाईक विठ्ठल विभुते, आप्पासो पवार, रवींद्र हांगे, नागेश निंबाळकर, संभाजी भोसले, पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव, सचिन देशमुख यांनी मंगळवार २६ रोजी रात्री दोनच्या सुमारास चिंचोली (ता. सांगोला) येथील माने वस्तीलगत ओढ्यात छापा टाकला़ यावेळी उत्तम हजारे, शिवाजी बेहेरे, धनाजी बेहेरे, रामा, रंगनाथ बेहेरे, भारत येडगे सह इतर दोन चालक (सर्वजण रा. चिंचोली) व बाळासाहेब माने (रा. वाढेगाव) असे सर्वजण चिंचोली गाव ओढ्यातून जेसीबी क्र.एम.एच.४५ एफ ९८१३ च्या साह्याने विनापरवाना एम.एच २४ डी ६३२८ व दोन विना नंबरच्या अशा तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चोरून वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलीस आल्याचे पाहून विना नंबरच्या ट्रॅक्टर चालकाने चालू स्थितीत ट्रॅक्टर सोडून दिल्याने तो मानेवस्तीवरील एका घरावर जावून धडकल्याने ट्रॅक्टरसह घराचे नुकसान झाले. पोलीस सदरची वाहने पोलिस स्टेशनला घेवून येत असताना शिवाजी बेहेरे व धनाजी बेहेरे यांनी पाठीमागून एम.एच ४५ एक्स ९४१० ही दुचाकी वाहनांना आडवी लावून डंपींग ट्रॅक्टर ट्रॉलीमधील वाळू रस्त्यावर सांडून सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ते दोघेजण पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.