सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवार २ सप्टेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात टाकलेल्या छाप्यात एका मोटरसायकलीसह ५ हजार १६५ लिटर हातभट्टी दारू व १ टन ११० किलो गुळ पावडर जप्त करून गुन्ह्यात ३ लाख ५९ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने शुक्रवार २ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यातील भिमराव काशिनाथ राठोड (वय ४२ वर्षे, रा. दोड्डी तांडा, ता. दक्षिण सोलापुर) याच्या राहत्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरात व घरासमोरील २ पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारु व गुळ पावडर साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी झडती घेतली असता २०० लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक बॅरलमध्ये ८०० लिटर हातभट्टी दारू, ५० लिटर क्षमतेच्या ६८ प्लास्टीक कॅनमध्ये 3400 लिटर हातभट्टी दारु, ८० लिटर क्षमतेच्या १२ रबरी ट्यूबमध्ये ९६० लिटर हातभट्टी दारु, १ लिटर क्षमतेच्या ५ प्लास्टीक बाटल्यांमध्ये ५ लिटर हातभट्टी दारु असा एकूण ५१६५ लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला, तसेच हातभट्टी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणा-या गुळ पावडरच्या ३० किलो क्षमतेच्या ३७ गोण्यातून १ टन ११० किलो गुळ पावडर जप्त करण्यात आले. तसेच सदर ठिकाणावरुन 4 रिकामे प्लास्टिक बॅरल, २० रिकाम्या रबरी ट्यूबा, १ वापरता मोबाईल, एक प्लास्टीक नरसाळे, १ मोटरसायकल असा एकूण ३ लाख ५९ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, आरोपी भिमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे करीत आहेत. सदर कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांचे नेतृत्वात उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे, निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आवताडे, सुरेश झगडे, सुनिल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान ईस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, प्रकाश सावंत, प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे, वाहनचालक संजय नवले व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.