साेलापूर : दारूच्या नशेत मला पती मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने मारत होता, त्याचा प्रतिकार केला; मात्र त्यात माझ्या हातून खून झाला अशी कबुली पत्नीने पोलिसांना दिली. या प्रकरणी पत्नीला अटक झाली असून, विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनी श्रीकांत यलगाेंडे (वय २७, रा. राजूर, ता. दक्षिण सोलापूर सध्या रोहिणी नगर भाग २ शिक्षक सोसायटी) असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, दि.२९ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता अश्विनी यलगोंडे ही दोन मुलांसोबत घरामध्ये झोपली होती. तेव्हा श्रीकांत झोपेतून उठला व बाळू मामा याचा मुलगा सचिन बिराजदार याला दवाखान्यात ॲडमिट केले आहे. मी दवाखान्यात जाऊन येतो असे सांगून पती श्रीकांत बाळासाहेब यलगोंडे (वय २७) हा निघून गेला; मात्र तो पहाटे ३.३० वाजता परत आला व सोनू सोनू म्हणून ओरडू लागला. अश्विनी यलगोंडे हिने दरवाजा उघडला असता तो कट्ट्यावर दारूच्या नशेत पडलेला दिसला. त्याला उचलून घरात घेऊन जात असताना अश्विनीच्या डोक्यावरील केसाला धरून शिवीगाळ करीत मारहाण करू लागला. अश्विनी तसेच घरात घेऊन जात असताना श्रीकांत याने फ्रीजवर ठेवलेला स्क्रू ड्रायव्हर घेतला व मारहाण करू लागला. धरलेले केस सोडावेत म्हणून अश्विनी हिने त्याच्या हातातील स्क्रू ड्रायव्हर हिसकावून घेतला.
श्रीकांत याच्या डोक्यावर मारल्याने तो जखमी झाला. त्याला तसेच ओढत आत नेले, बाथरुममध्ये नेऊन आंघोळ घातली व बेडरुममध्ये नेले. तेथे डोक्याला हळद लावली व कपडे घालून झोपवले. अश्विनी ही पुन्हा आपल्या मुलाजवळ जाऊन झोपली. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास बेडरुममध्ये जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. नातेवाईकांना फोन करून घरी येण्याची विनंती केली असता कोणी आले नाही. दि.३० ऑगस्ट रोजीही तो उठला नाही. दि. ३१ ऑगस्ट रोजीही तो झोपलेल्या स्थितीत होता तेव्हा जवळ जाऊन पाहिले असता त्याचे अंग थंड पडले होते. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले असे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी फौजदार सूरज मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे.
शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खून झाल्याचे उघड
० पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर अश्विनी हिने भावाला फोन करून बोलावून घेतले, तेव्हा त्याने याची माहिती नातेवाईकांना व पोलिसांनी देण्यास सांगितले. विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यावर टोकदार वस्तूने वार झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला. पोलिसांनी पत्नी व मेहुणा यांना चौकशीला बोलावल्यानंतर पत्नीने सर्व हकीकत सांगितली.