राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहर व जिल्ह्यात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा आणि बेडशीटचे बिल भरमसाट लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याची चौकशी करून बिल अदा करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरम्यान, भोजन, नाष्ट्याचे बिल २१ मार्चपासून दिलेच नसल्याची खंत ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात कोरोना साथ सुरू झाल्यावर क्वारंटाईन केंद्राची व्यवस्था करण्यात आली. सोलापुरात सिंहगड इन्स्टिट्यूट, विद्यापीठ, केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि इंदिरा गांधी, आर्चिड इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, बीएसएफ कॅम्प बरुर या ठिकाणी क्वारंटाईन केंद्रे सुरू करण्यात आली. या ठिकाणी दाखल होणाºया नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी बांधकाम खात्यातर्फे निविदा काढण्यात आली. जेवणासाठी प्रगती, हेरिटेज व मैत्री या तीन फर्मला व साहित्य पुरविण्यासाठी एका फर्मला वर्कआॅर्डर देण्यात आली.
साहित्य पुरविण्याचा ठेका दिलेल्या फर्मने सर्व क्वारंटाईन सेंटरला गाद्या, उशा,उशी कव्हर, बेडशीट, बादली, मग, झाडू, डस्टबीन, टॉवेल, साबण, ब्रश, पेस्ट असे साहित्य पुरविले. त्यानंतर साहित्य आणि जेवणाचे बिल आत्तापर्यंत तीन टप्प्यात बांधकाम विभागाकडे सादर केले आहे. यामध्ये गादी : ७००, बेडशीट : २१०, उशी: १४० रुपये अशी बिल आकारणी केली आहे. बांधकाम विभागाकडे २ कोटी ७७ लाख ६६ हजारांची ही बिले पडून आहेत. त्यानंतर बांधकाम खात्याने तपासणी करून २ कोटी ४३ लाख ३३ हजारांचे बिल महापालिकेकडे पाठवून दिले आहे. जिल्हा नियोजनकडून महापालिकेस प्राप्त होणाºया निधीतून हे बिल अदा करण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे.
जेवणाचे बिल अडलेसाहित्य बिलावरून वाद होऊ नये यासाठी बांधकाम विभागाकडून ही फाईल महापालिकेकडे वर्ग केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या सूचनेनुसार असा प्रस्ताव महापालिकेकडे दिल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे यांनी सांगितले. जेवणासाठी नाश्ता: २0 रुपये, जेवण: ६0 रुपये, एका व्यक्तीसाठी दिवसाला १४0 रुपये आणि प्रतिखेप वाहन खर्च: २00 रुपये दर ठरला आहे. २१ मार्चपासून जेवण पुरविले पण अद्याप एक रुपया अदा करण्यात आला नाही अशी खंत ठेकेदारांनी व्यक्त केली.