बार्शी : माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेत बार्शी टेक्सटाइल मिल सुरू करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी आमदार राजेंद्र राऊत यांनी ही मागणी त्यांच्याकडे केली होती.
लॉकडाऊन काळापासून अडचणीत सापडलेल्या ४५० कामगारांच्या कुटुंबाच्या रोजी-रोटीचा विचार करून त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दोन वेळा पत्रव्यवहार करुन मिल सुरू करण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने आमदार राजेंद्र राऊत यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यानंतर त्यांनी बार्शीतील कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न संसदेमध्ये मांडला.
बंद असलेले मिल सुरू करण्यासाठी २६ डिसेंबर २०२१ रोजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पत्र घेऊन बार्शीचे शिष्टमंडळ खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भेटले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम, भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, महाराष्ट्र गिरणी कामगार संघटनेचे नागजी सोनवणे उपस्थित होते.
सध्या अधिवेशन सुरू असून, संसदेमध्ये खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी मिल सुरू करण्याची मागणी केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मिल कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कामगारांनी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेतली आणि आनंद व्यक्त केला.
फोटो : ०७ बार्शी
बार्शीतील बंद गिरणीचा प्रश्न संसदेत उपस्थित करण्याबाबत एका शिष्टमंडळाने खासदार रामराजे नाईक-निंबाळकर.