सोलापूर : एलबीटीमुळे व्यापारी नाराज आहेत तर पोलीस हेडक्वॉर्टर मस्जिदचा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे मुस्लीम समाज नाराज आहे, शहरातील पाण्याचा प्रश्न यामुळेच काँग्रेसला फटका बसला आणि सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला, अशा भावना चिंतन बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर काँग्रेस पदाधिकार्यांनी मांडल्या़ दादर येथील टिळक भवनात शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती़ या बैठकीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गृहराज्यमंत्री प्रतीक पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, आ़ दिलीप माने, आ़ प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड, शहराध्यक्ष धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बाबा मिस्त्री आदी उपस्थित होते़ सोलापुरातून शिंदे यांच्या पराभवाबद्दल यावेळी मते व्यक्त करण्यात आली़ माझ्या आणि प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतदार आहेत़ पोलीस हेडक्वॉर्टरच्या मस्जिदचा प्रश्न न सुटल्यामुळे मुस्लीम समाज नाराज आहे़ गृहमंत्री आऱआऱ पाटील यांना देखील विषय माहीत आहे, मात्र प्रश्न सुटला नाही़ व्यापार्यांचा एलबीटी प्रश्न आणि मुस्लीम समाजाचा मस्जिदचा प्रश्न त्वरित सोडवा, अशी मागणी आ़ माने यांनी यावेळी केली़ गोरगरिबांना वेळेवर रेशनकार्ड मिळत नाही याकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे, अशा भावना आ़ प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या़ मतदानापूर्वी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होता याचा देखील राग मतदारांनी व्यक्त केला, असे महापौर अलका राठोड म्हणाल्या़ विधानसभा निवडणुकीसाठी पाच आमदारांमागे एक मंत्री नेमण्याचा व त्या मंत्र्याने त्या आमदारांचे प्रश्न सोडवावेत, असा निर्णय झाल्याचे खात्रीलायक समजते़ सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी वनमंत्री पतंगराव कदमांवर सोपविल्याचे समजते़
---------------------------------
मुस्लीम समाज काँग्रेसवर नाराज होता, तरीही आम्ही लोकसभेमध्ये मनापासून काम केले़ आमचे प्रश्न सुटले नाहीत तर काँग्रेसला आम्ही मतदान करणार नाही़ -तौफिक शेख काँगे्रस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष
---------------------------------
पोलीस हेडक्वॉर्टर मस्जिदचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मुस्लीम समाज तर एलबीटीमुळे व्यापारी नाराज आहेत़ या दोन्हीही प्रश्नांवर लवकर निर्णय घेतला पाहिजे़ - आ़ दिलीप माने