पंढरपूर : पंढरपुरात तीन महिन्यांपासून बंद असलेले दारूचे दुकान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने सुरू होताच मद्यप्रेमींची रिमझिम पावसात देखील दारू खरेदीसाठी ५०० मीटरपर्यंत रांग लागली आहे.
वाईन शॉप सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परमिट रूम धारकांना देखील मूळ किंमतीला पार्सल स्वरूपात मद्य विक्री करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर ज्याच्याकडे दारू पिण्याची परवानगी असेल अशाच लोकांना दारू मिळत होती. प्रत्येक ग्राहकाचे शरीरातील तापमान तपासण्यात येत होते. त्यानंतरच दारू विक्री करण्यात येत होती.
सकाळी अकराच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक महेश तावरे, निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. व्ही भंडारी, अलीम शेख, विनायक वालूजकर, सुरेश ननवरे, एस एस पाटील, विजय शेळके यांनी मध्य शहरातील मद्य विक्रीची दुकानाचे तपासणी केले. त्याचबरोबर अधिकृत दुकानदारांना दुकान सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी दारूच्या दुकानासमोर मद्याप्रेमींची ५०० मीटरपर्यंत रांग लागली होती. रिमझिम पाऊस सुरुवात झाला तरी एकही ग्राहक रांग सोडून निघून गेला नाही. दारूची दुकाने सुरू झाल्यामुळे मद्याप्रेमींच्या चेहºयावर आनंद दिसत होता.