सोलापूर - सोलापूर विमानसेवेस अडथळा असलेली सोलापूर शहरातील श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि., च्या सहविद्युत प्रकल्पाची बेकायदेशीर चिमणी त्वरीत पाडून सोलापूरच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या पदाधिका ऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर याबाबत तोडगा काढून सोलापूरकरांना न्याय द्यावा असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना घातले आहे.
सोलापूर शहरातील श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि., च्या सहविद्युत प्रकल्पाची बेकायदेशीर चिमणी इसवी सन 2014 साली बांधण्यात आलेली आहे. सदर चिमणी ही कोणत्याही सक्षम प्राधिकाज्याची कायदेशीर पुर्व परवानगी न घेता बांधण्यात आलेली आहे, हे अगदी भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या न्यायिक प्रकरणामध्ये शाबीत झालेले आहे. सदर बेकायदेशीर चिमणीमुळे सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावरुन केंद्र सरकारच्या नागरी व उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजनेअंतर्गत प्रवासी विमान वाहतुक सेवा अद्याप सुरु होत नाही. त्यामुळे संपुर्ण सोलापूर जिल्हयासह परिसराचा विकास खुटंलेला आहे. एकेकाळी सोलापूर शहर हे महसुली उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात राज्यात व्दितीय क्रमांकवर होते आणि सद्यस्थितीत अत्यंत मागेे फेकले गेलेले आहे. सोलापूर शहरामध्ये विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय, व्यापार उदीम हा खुटंलेला आहे. कोणतेही नवे उद्योग सोलापूर शहरात येण्यास तयार नाहीत. सोलापूर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे सोलापूरातील नवीन पिढी ही अत्यंत वेगाने विस्थापित होत चालेली आहे. म्ॉग्ने्ेटीक महाराष्ट्र 2.0 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो कोटींची गुंतवणुक झालेली आहे. परंतु त्या गुंतवणुकीपौकी सोलापूर जिल्हयामध्ये एका दमडीची सुध्दा गुंतवणुक झालेली नाही.
दरम्यान, होटगी रोड, विमानतळ सोलापूर हा संपुर्णत: सुसज्ज विमानतळ असुन सुध्दा फक्त सदर सिध्देश्वर सहकारी कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाच्या बेकायदेशीर चिमणीमुळे सदर विमानतळावरुन आजतागायत प्रवासी वाहतुक सेवा सुरु होऊ शकली नाही. सोलापूर विकास मंचाने नागरीकांमार्फत निर्माण केलेल्या जनमतांच्या रेटयामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रसिध्द केलेली चिमणी पाडकामाची निविदा ही अंतिम टप्यात आहे. उपरोक्त प्रमाणे वस्तुस्थिती असून सुध्दा शासनातील अवर सचिव किशोर गोखले यांनी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना जावक क्र.टी.पी.एस.1720/1390/नवि-13 या पत्रानुसार सदर बेकायदेशीर चिमणीचे पाडकाम करण्यापुर्वी विधि व न्याय विभागाच्या सल्याची वाट पहावी असे संपुर्णत: अयोग्यपणे, अनावश्यकपणे आणि बेकायदेशीरपणे कळविलेले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी "विधि व न्याय विभागाचा आदेश येईपावेतो सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाची बेकायदेशीर चिमणी पाडणार नाही" असे विधान केल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले आहे. अवर सचिवांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठविलेले सदर जावक क्र. टी.पी.एस.1720/1390/नवि-13 पत्र हे संपुर्णत: अयोग्य, अनावश्यक, बेकायदेशीर असून, सोलापूर जिल्हयाच्या विकासामध्ये जाणीवपुर्वक अडथळा निर्माण करणारे आहे अशी भावना लाखो सोलापूरकरांच्या मनामध्ये पसरलेली असून, त्याबाबत जनतेंच्या मानामध्ये सरकार व प्रशासनाविरुध्द अत्यंत भयानक अशी प्रचंड नाराजी व रोष पसरलेला आहे. तरी ते पत्र मागे घेण्यासंदर्भात आदेश द्यावेत व विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी त्वरीत पाडावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी केतनभाई शहा, मिलिंद भोसले, अॅड.प्रमोद शहा, अॅड.खतीब वकील, श्रीनिवास वौद्य, योगिन गुर्जर, विजय जाधव, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.