अकलूज : बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ खा. विजयसिंह मोहिते -पाटील यांनी विशेष लक्ष द्यावे, यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज अकलूज येथील शिवरत्नवर खा. मोहिते- पाटील यांची भेट घेऊन दोन तास बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील समर्थकांची गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
माढा व सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा खा. विजयसिंह मोहिते-पाटील सांभाळत असताना आता बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी आ. राहुल कुल व हर्षवर्धन पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी मंगळवारी दुपारी शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी बंद खोलीत सुमारे दोन तास राजकीय विषयावर चर्चा केली़ खा. विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा, सोलापूरबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत़