सांगोला : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला तालुक्यात कोळे येथील गावात दोन ठिकाणी छापे टाकून मटका घेताना दोघा एजंटाना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १३ हजार ३१० रुपयांसह जुगार साहित्य जप्त केले.
मंगळवारी (दि. २९) २.२० वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी बुकीमालक अनिल खटकाळे (रा. घेरडी, ता. सांगोला), एजंट दादासाहेब राजाराम आलदर आणि सुधीर गणपती तेली (दोघेही रा. कोळे, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इसाक अब्बास मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण गोलेकर, धनाजी गाडे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी यांचे पथक गस्त घालत असताना मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, कोळे गावातील दोन कापड दुकानालगत असलेल्या पत्राशेड आणि एका खोलीत दोघेजण पैज लावून ‘कल्याण मटका’ घेत होते. तेव्हा पथकाने धाड टाकली.