सोलापूर: राहत्या घरामध्ये कुंटणखाणा चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिऱ्हाईकास पाठवून खात्री केली अन् सापळा लावून या प्रकाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. पिडितेच सुटका करण्यात आली. निलम श्रमजीवीनगर येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाणा चालवणाऱ्या महिलेस अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शहरामध्ये छुप्या पद्धतीने कुंटणखाना सुरु असल्याची खबर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून समजली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी खबऱ्याच्या माहितीनुसार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:५५ च्या सुमारास निलम श्रमजीवी नगरातील मार्कंडेय चौकात जाऊन संबंधीत घरात बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा केली. शहानिशा केल्यानंतर सापळा लावून गंगुबाई आण्णप्पा रोकडे (वय- ५०) या महिलेला अटक केली. या सापळ्यात आढळलेल्या पिडित महिलेची सुटका करण्यात आली.
सदर महिला आपल्या स्वत:च्या घरामध्ये पिडितेची पिळवणूक करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असे व तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वत:ची उपजीविका करायची अशी माहिती समोर आली. सदर महिलेला अटक करुन न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला. या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भां. द. वि. वि. ३७० अ (२) अन्वये गुन्हा नोंदला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. सर्व प्रकारचे कुंटणखाने बंद करण्यात येतील. - महादेव राऊत, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर