पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा होत असलेल्या ठिकाणावर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी गुरुवारी भल्या पहाटे धाड टाकली. या कारवाईत गोपाळपूरचे उपसरपंच विक्रम आसबे यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून वाळूचोरीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली. या कारवाईत आरोपींना ८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे वाळूउपसा होत असल्याची पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी पहाटे वाळूउपसा होणाऱ्या ठिकाणी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, सहायक पोलीस निरीक्षक शंकर ओलेकर, पोलीस नाईक श्रीराम ताटे, पोलीस शिपाई शिवशंकर हुलजंती, देवेंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने धाड टाकली. कारवाईत दोन पिकअप, दोन मोटारसायकली, वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी बैलगाडी असा एकूण ८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
--
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या कारवाईत गोपाळपूरचे उपसरपंच विक्रम आसबे, ग्रामपंचायत सदस्य उदय पवार, स्वप्नील आसबे, सागर चव्हाण, पप्पू कोले, सागर घंटे, दीपक घंटे व इतर तिघे अशा एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. पोलीस शिपाई शिवशंकर हुलजंती यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
---
फोटो : २० गोपाळपूर
गोपाळपूर येथे वाळू वाहने जप्त करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, शंकर ओलेकर, शिवशंकर हुलजंती.