सोलापूर : विजापूर रोडवरील एका घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने केली असून, पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
वर्षा दत्ता माशाळे (वय ३२, रा. महालक्ष्मी नगर), सुजाता विवेक कांबळे (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद नगर, ओमगर्जना चौकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महालक्ष्मी नगरात घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती, अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना मिळाली होती. पथकासह त्यांनी मंगळवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला, बनावट ग्राहक पाठवून दिले. बनावट ग्राहक आत गेला, त्याने पैसे दिले व आत जाताना बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. इशारा मिळताच पोलिसांनी घरात धाड टाकली तेव्हा कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिला व पीडित महिला आढळून आल्या. पीडितेकडे चौकशी केली असता, दोघींनी व्यवसाय करण्याच्या बदल्यात पैसे मिळत असल्याचे सांगितले.
या प्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजया कुर्री, हवालदार बंडगर, पोलीस नाईक सत्तार पटेल, महिला पोलीस नाईक गवळी, मुजावर, मंडलिक, उषा माळगे, सीमा खोगरे, शैला चिकमळ, चालक गोरे यांनी पार पाडली.