सोलापूर : मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्पे्रस चोरट्यांनी सिग्नलला चिखल लावून पोफळज (ता. करमाळा) जवळ थांबवली़ चोरट्यांचा डब्यात घुसण्याचा प्रयत्न आरपीएफ जवानांनी हाणून पाडला़ तसेच या जवानांनी ही एक्स्प्रेस पुढे पाठवून नाटक रचत उसाच्या फडात लपून बसलेल्या सहा जणांपैकी एकाला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़
पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव सुभाष सुरेश पवार (वय ३०, रा़ केडगाव, जेऊर, करमाळा) आहे़ मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्प्रेस पहाटे २ वाजता पोफळजजवळ आली असता गाडीचा वेग एकदम कमी झाला़ चालकाला सिग्नल बंद अवस्थेत दिसला़ सिग्नल मिळत नसल्याने गाडी पुढे हलेना़ याचवेळी एका डब्यात पाच-सहा चोरटे चढण्याचा प्रयत्न करीत होते़ हा प्रकार आरपीएफ जवानांच्या लक्षात आला़ इतर जवान खाली उतरत त्यांना पिटाळून लावले़ सिग्नलजवळ गेले असता त्यावर चिखल लावल्याचे निदर्शनास आले़
दरम्यान, चिखल हटवून या जवानांनी नाट्यमयरित्या या चोरट्यांना पकडण्याचा चंग बांधला़ याचवेळी चालकाने स्टेशनमास्तरांशी संपर्क साधून आरपीएफ जवानांच्या पथकाला पाचारण केले़ पथक दाखल होताच खाली थांबलेल्या जवानांनी कुर्डूवाडीच्या पथकाला गाडीत बसवून पाठवून दिले़ गाडी पुढे निघाली आणि डब्यातून खाली उतरलेले जवान दबा धरुन बसले़
याचवेळी बाजूला असलेल्या उसाच्या फडातून पाच-सहा दरोडेखोर बाहेर आले आणि त्यांच्या मागावर दबा धरुन बसलेल्या आरपीएफ जवानांना पाहताच अंधारात पळ काढला़ या जवानांनी पाठलाग करुन एका संशयित चोरट्याला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़ या संशयित चोरट्याला त्याच्या मोटरसायकलसह कुर्डूवाडी आरपीएफच्या हवाली केल्याचे सांगण्यात आले़