सोलापूर : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील इंजिनियरिंग कार्यालयाचे नुकसान झाले. संगणक, प्रिंटर व इतर आवश्यक साहित्य व कागदपत्रे भिजल्यामुळे रेल्वेचे १३ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
शहरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकाजवळ नाला तुंबला. याशिवाय विभागीय रेल व्यवस्थापक कार्यालय ते रेल्वे स्थानकादरम्यान कुमार चौकात पाणी साचले आणि काही घरांमध्ये सुद्धा पावसाचे पाणी शिरले होते. याच दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले सहायक विभागीय इंजिनियरच्या कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. यामुळे कार्यालयातील ६ कॉम्प्युटर आणि ६ प्रिंटर खराब झाले. त्याचबरोबर २ यूएसएफडी मशीन्स खराब झाल्या. त्याची जवळपास १३ लाख रुपये किंमत होती. खराब साहित्यामुळे रेल्वे प्रशासनाचे कामकाज मागील दोन दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
रेल्वे प्रशासनाचा कोणताही दोष नाही...- रेल्वे प्रशासनाने वॉटर रिसायकलिंग केंद्र उभारल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे सांगण्यात आले. परंतु ही बाब खोटी आहे. वॉटर रिसायकलिंग केंद्राजवळील नाल्यातून पूर्णपणे पाण्याचा निचरा होत होता. पावसाचे पाणी घरामध्ये शिरण्याचे मुख्य कारण नाल्यात कचरा, प्लास्टिकच्या वस्तू आणि इतर घाण अडकल्यामुळे पाण्याचा निचरा न होता पाणी तुंबले आणि आसपासच्या परिसरात पसरले. २३ सप्टेंबर रोजी महापालिकेचे कर्मचारी नाल्यामधील अडकलेला कचरा काढत होते. सोलापूर महापालिकेकडून नाल्यातील कचरा न काढल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. यामध्ये रेल्वे प्रशासनाचा कोणताही दोष नाही. यापुढी अधिक पाऊस झाल्यास महानगरपालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक हिरडे यांनी सांगितले़