सोलापूर : वार मंगळवार... मध्यरात्री बाराची वेळ... रामवाडी गोडावून परिसरात तांदळाने भरलेली बोगी थांबलेली... दोन मोटरसायकलवर स्वार होऊन सहा चोरटे आले... खडकन् आवाज आला... खाकी वर्दीला पाहताच त्यांनी लपण्याचा प्रयत्न... गस्तीवरच्या जवानाने त्यांना अचूक हेरले... पाहता-पाहता दोघांमध्ये धुमश्चक्री सुरू... जवानास जीवे मारण्याचा प्रयत्न करीत चोरट्यांनी केली दगडफेक... पहाटेच्या चार वाजेपर्यंत चोरांना परतवून लावण्यासाठी त्या धाडसी जवानाने हवेत तीन वेळा गोळीबार केला; मात्र तावडीत येणारे चोरटे पळ काढण्यात यशस्वी ठरले, परंतु जवानाने न डगमगता कर्तव्य बजावल्याबद्दल प्रशंसा होत आहे.
शरद लोेंढे असे त्या आरपीएफ जवानाचे नाव असून, मंगळवारी पहाटे चार तास चाललेल्या थराराची दखल घेत लोंढे यांच्या पाठीवर आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी कौतुकाची थाप देत त्यांनी हा थरार प्रसारमाध्यमांपुढे मांडला़ मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाशेजारी असलेल्या रेल्वे ट्रॅकवर तांदळाच्या पोत्याने भरलेली बोगी होती़ या बोगीतील तांदळाची पोती चोरण्यासाठी दोन मोटरसायकलवर आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला़ यावेळी गोदामात सुरक्षेसाठी तैनात असलेला जवान शरद लोंढे याने संबंधित चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला़.
यावेळी चोरट्यांनी त्या जवानावर दोन वेळा दगडफेक केली़ या दगडफेकीनंतर शरद लोंढे या जवानाने चोरीघटनेची माहिती देत रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकचा फोर्स मागविला़ मध्यरात्री एक ते पहाटे तीनपर्यंत या फोर्सने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला़ त्यानंतर ज्यादा फोर्समधील जवानांनी घटनास्थळ सोडले़ त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा गोदामात असलेल्या तांदळाची पोती चोरण्याचा प्रयत्न केला़ हा प्रकार निदर्शनास येत असताना जवान शरद लोंढे यांनी पुन्हा त्या चोरट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चोरट्यांनी पुन्हा दगडफेक केली़ या घटनेची तीव्रता वाढत असल्यामुळे आरपीएफ जवान शरद लोंढे यांनी पहाटे चारच्या सुमारास तीन वेळा हवेत गोळीबार करून चोरांना हुसकावून लावले.
या घटनेची माहिती समजताच विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर व अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ या घटनेची माहिती देण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलिसांना पाचारण करण्यात आले़ संबंधित शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित पाच ते सहा चोरट्यांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली.
एकट्यानेच दिले सहा जणांना तोंड - मागील काही महिन्यांपासून रेल्वेच्या रामवाडी गोदामात चोरीच्या घटना घडत असल्यामुळे आरपीएफ पोलिसांनी रामवाडी गोदामात रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी दोन जवानांची नियुक्ती केली होती. यामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती, मात्र मंगळवारी पहाटे चोरट्यांनी पुन्हा चोरीचा प्रयत्न केला़ त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी ज्यादा सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे़ मंगळवारी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका जवानावर दोन ते तीन वेळा दगडफेक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे होत असलेल्या चोरीचा प्रकार रोखणे व स्वरक्षणासाठी आरपीएफ जवान शरद लोंढे यांनी हवेत गोळीबार केल्याचा खुलासा विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी केला आहे़