गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात पंढरपूर शहरासह पटवर्धन कुरोली, करकंब, भाळवणी, गादेगाव, कासेगाव, कोर्टी, गोपाळपूर, तुंगत, सुस्ते, आंबे, चळे, खर्डी, मेंढापूर आदी परिसरातील गावांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्रभर काही गावांमध्ये संततधार सुरू होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी या समाधानकारक पावसाने सुखावला आहे. त्यामुळे पावसाअभावी थांबलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा गती प्राप्त झाली आहे.
-------
ऊस, मका, फळबागांसाठी वरदान
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पंढरपूर तालुक्यातील बागायती क्षेत्र धोक्यात आले होते. रब्बीच्या दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर होते. मक्याची पिकेही संकटात होती. डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव वाढत होता. केळी, द्राक्ष या फळबागांना हवी तेवढी चकाकी मिळत नव्हती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर होते. मात्र, दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ऊस, मका, डाळिंब या पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे. खरिपाच्या दुबार पेरणीचे संकटही काही प्रमाणात कमी झाले असल्याचे चित्र आहे.