हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेमध्ये ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई हुपरे होत्या.गावाच्या समस्यांबाबत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आवाज उठवून शासनदरबारी समस्या मांडणाऱ्या ‘लोकमत’मधील प्रसिद्ध बातम्यांची कात्रणे असणारा भलामोठा डिजिटल फलक ग्रामपंचायतीने उभारला होता. परिणामी, गावामध्ये प्रजासत्ताकदिनी फक्त आणि फक्त ‘लोकमत’चीच चर्चा होती. वर्षभरात ग्रामपंचायतीने गावामध्ये केलेली विविध विकासकामे, चालू वर्षाच्या कालावधीमध्ये करावयाच्या विकासकामांचे नियोजन याबाबतची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशांचे वितरण, तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अकरा वाजता ग्रामसभेच्या कामकाजास सुरुवात झाली. सभेत विषयांचे व परिपत्रकांचे वाचन ग्रामसेवक एम. व्ही. पाटील यांनी केले. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत ग्रामपंचायतीने काय प्रयत्न केले व कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबतची सविस्तर माहिती उपसरपंच राजेंद्र हवालदार यांनी दिली. सन २०१२ पर्यंत निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाशी वेळोवळी भांडण करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. त्याला ‘लोकमत’ने नेहमीच साथ दिली आहे. (वार्ताहर)निर्भीड पत्रकारितागावातील प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने निर्भीडपणे सातत्याने बाजू मांडली आहे. त्याबद्दल ग्रामसभेमध्ये ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा मुद्दा आबिद मुल्लाणी यांनी मांडला. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास मंजुरी दिली.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे तळंदगे (ता. हातकणंगले) गावामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी उठविलेल्या आवाजाची कात्रणे असणारा फलक ग्रामपंचायतीच्यावतीने प्रजासत्ताकदिनी उभारला आहे.
तळंदगेत ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव
By admin | Published: January 28, 2015 12:44 AM