राजकुमार सारोळे
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून २१ कोटी खर्चुन करण्यात येणाºया स्मार्ट रोडचे करावे तेवढे कौुतक कमीच आहे. आता हा स्मार्ट रस्ता की पोहण्याचा तलाव आहे असा प्रश्न पडला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेले हे काम कधी पूर्ण होणार अशी चर्चा असताना हरिभाई देवकरण प्रशालेसमोर भुयारी पूल बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या डबक्यात चक्क मुले पोहत असल्याचे धोकादायक चित्र पहावयास मिळत आहे.
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कंपनीतर्फे पथदर्शी प्रकल्प म्हणून रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान स्मार्ट रोड (खर्च :२0 कोटी ९७ लाख) आणि रंगभवन चौकाचे सुशोभीकरणाचे काम (खर्च ४ कोटी ७७ लाख) हाती घेण्यात आले. रंगभवन चौकात पब्लिक प्लाझा बांधण्याचे काम मे २0१८ पासून सुरू करण्यात आले. सहा महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना चार महिन्यात केवळ २0 कॉलम उभारून त्यावर स्टिल बीम उभारण्यात आले आहेत.
स्मार्ट रोडच्या कामास सप्टेंबर २0१७ मध्ये सुरुवात झाली. डिसेंबर २0१८ अखेर हे काम पूर्ण करावयाचे आहे. जानेवारी महिन्यात यात्रेसाठी महिनाभर काम बंद ठेवावे लागले. सद्यस्थितीत रंगभवन ते मराठा मंदिर या मार्गावरील डाव्या बाजूचे २00 मीटरचे डक्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. डाव्या बाजूने उत्तर पंचायत समितीपर्यंतचे डक्टचे काम झाले आहे.
पंचायत समितीपासून मराठा मंदिर, खिंडरोड ते व्हीआयपी रोडपर्यंतच्या नाल्यापर्यंत स्टॉर्म ड्रेनेजलाईन (१0३0 मीटर) टाकण्यात आली. त्यानंतर खिंडरोडचे काम पूर्ण करण्यात आले. आता दुसºया टप्प्यात २ मेपासून मराठा मंदिर ते डफरीन चौक व तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उजव्या बाजूला डक्ट तयार करण्यासाठी पाणी, ड्रेनेजलाईन, वीज व टेलिफोन लाईन शिफ्टिंग करण्याचे काम सुरू आहे. आता उरलेल्या चार महिन्यात स्मार्ट रोडचे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे.