माळशिरस : पावसाळी हंगामातील अखेरचा टप्पा येऊन ठेपला आहे. ढगाळ हवामान, सततची रिमझिम यामुळे तालुक्यात पावसाळी हवामान वाटत असले तरी प्रत्यक्ष मात्र मोठ्या पावसाचा अभाव कायम आहे. गणेशोत्सव, नवरात्री मधील नक्षत्रात बळीराजाला चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मात्र ऑगस्ट महिना संपला तरीही पावसाने चकवा दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
मागील दोन वर्षात माळशिरस तालुक्यात सरासरी पर्जन्यमान चांगले झाले होते. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी समाधानकारक स्थितीत होती. यावर्षीही नेहमीप्रमाणे बळीराजाला चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र सुरुवातीपासूनच तालुक्यातील काही मोजक्या ठिकाणी चांगल्या पावसाने हजेरी लावली. इतरत्र अद्यापही मोठा पाऊस पडला नाही. सततची रिमझिम, ढगाळ हवामान, पावसाळी वातावरण तयार होत असून प्रत्यक्ष मात्र पावसाचा चकवा कायम आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. तरीही बळीराजाला भविष्यातील नक्षत्रात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
लांबलेल्या पावसाची बळीराजाला चिंता लागली आहे. तालुकानिहाय पाऊस माळशिरस तालुक्यात ३ सप्टेंबर रोजी माळशिरस ४ मिमी, सदाशिवनगर २० मिमी, इस्लामपूर शून्य, नातेपुते शून्य, दहिगाव ०२ मिमी, पिलीव ०३ मिमी, वेळापूर ०२ मिमी, महाळुंग ०३ मिमी, अकलूज ०३ मिमी, लवंग ०४ मिमी असा ४१ मिमी तर सरासरी ४.१ मिमी पाऊस झाला आहे.