सचिन कांबळे -
पंढरपूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी झालेल्या सौद्यात बेदाण्याला चक्क किलोला ४०० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. पाटकूल (ता. मोहळ) येथील नितीन वसंत गावडे यांचा ४४ बॉक्स (६६० किलो) बेदाणा सांगली येथील व्यापारी प्रवीण सारडा यांनी ४०० रुपये दराने खरेदी केला, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे यांनी दिली.
पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याचा बाजार मंगळवारी व शनिवारी मोठ्या प्रमाणात भरतो. या बेदाणा बाजारामध्ये सोलापूर, विजापूर, सांगली, सातारा, तासगाव, कर्नाटक, तुळजापूर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून व शहरातून बेदाणा पंढरपूरमध्ये विक्रीसाठी येतो. आठवड्याला अंदाजे १० टनांच्या २५० गाड्यांची आवक प्रत्येक आठवड्याला होत आहे, तर मार्च, एप्रिल, मेमध्ये अधिक मागणी असते.
पंढरपुरातून तामिळनाडू ते काश्मीर असा पंढरपूरचा बेदाणा प्रसिद्ध आहे.