सोलापूर - शिवस्मारकासाठी पंतप्रधान समुद्रात गेले होते, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. काय झालं त्या स्मारकांचं? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. नांदेडनंतर सोलापूर येथे मनसेची जाहीर सभा झाली. त्या सभेत राज यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आमच्या महाराजांचे खरं स्मारक हे त्यांनी उभारलेले गड-किल्ले आहेत, त्यांची नीट निगा राखणे हेच खरं महाराजांचे स्मारक ठरेल. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची माझी कल्पना आहे की जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय त्याठिकाणी उभं करा. जगातले लोकं इथे ज्ञान घ्यायला येऊ देत तिथे, हेच खरं स्मारक असेल. मात्र स्मारकाची स्वप्न दाखवली गेली ती स्मारकं आहेत कुठं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच नरेंद्र मोदींवर देशातील लोकांनी भरभरून प्रेम केलं, त्यांना प्रचंड बहुमत दिलं पण मोदींनी देशाला जनतेला फसवलं. अर्थकारणापासून ते सत्ताकारणांपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त ८ ते १० लोकांच्या हातात राहतील अशी व्यवस्था नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना भारतात हवी आहे.आणि म्हणूनच ह्या दोघांना राजकीय क्षितिजावरून हटवलं पाहिजे. इतकंच नव्हे तर ह्यांना मदत करणाऱ्यांना देखील मतदान करू नका असं सांगून राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही मतदान करु नका असं आवाहन लोकांना केलं.
नवाज शरीफना लव्ह लेटर पाठवू नका असं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफना शपथविधीला बोलावू लागले, त्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवू लागले. काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना? नरेंद्र मोदी नव-मतदारांना आवाहन करत आहेत की पुलवामाच्या शहिदांच्या स्मृतीसाठी मतं द्या. शहिदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. इतका निर्लज्ज पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.