मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. मनसेविरुद्ध अनेक पक्ष असा सामना सध्या रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत राज्यातील अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम केला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांचा आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर, आता मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंनाच चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे या मनसैनिकाचा राज ठाकरेंनी एकेकाळी सत्कारही केला होता.
मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आवाहन दिलं आहे. सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन. राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
अजित कुलकर्णी यांनी सोलापूर मनसेच 3 वर्ष शहर उपाध्यक्षपद भूषवलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस मनसेने टोल प्रश्न हाती घेतला होता, त्यावेळी टोल फोडल्यानंतर अजित कुलकर्णींचा राज ठाकरेंनी मुंबईला बोलावून सत्कार केला होता. दरम्यान, राज ठाकरे हे कांही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस आणि आता भाजपचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत, अशी ही टीकाही कुलकर्णी यांनी केली आहे.
मुंबई, मराठवाड्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला.