सोलापूर : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्वाधिक तीन कोटी ७१ लाख रुपये निधी खर्च केला असून, याउलट अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एक कोटी ४ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. सरासरी सर्वांनी ७७ टक्के निधी खर्च केला आहे.
ग्रामीण व शहरी भागात विविध विकासकामांसाठी आमदारांना राज्य सरकारकडून दरवर्षी तीन कोटींचा विकासनिधी मिळतो. चालू वर्षापासून यात आणखी एक कोटीची भर पडणार आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी आमदारांना विकास निधीसाठी चार कोटींचा निधी मिळणार आहे. २०२०-२१ या वर्षी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी विकास निधी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे.
मागील दोन वर्षांत आमदारांना विकासनिधी सोबत कोरोना उपचारासाठीही भरीव निधी मिळाला आहे. कोरोना उपचार तसेच उपाययोजनांसाठी ५० लाखांचा निधी राखीव ठेवल्यामुळे आमदारांनीही सढळ हाताने कोरोनासाठी निधी खर्च केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक झाले. कोरोनाकाळात अनेक विकासकामे आमदारांना करता आली नाहीत.
चालू वर्षात फक्त दीड कोटी
चालू २०२१-२२ वर्षात आमदारांना फक्त दीड कोटीचा विकासनिधी मिळाला आहे. उर्वरित दीड कोटी लवकरच मिळेल. प्राप्त निधी बहुतांश आमदारांनी निधी खर्च केल्याची माहिती आहे. याच कोरोना उपाययोजनांसाठी पन्नास लाख निधीचाही समावेश आहे.
शिंदे बंधू आघाडीवर
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे तसेच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी प्राप्त निधीपैकी ९० ते सव्वाशे टक्के निधी खर्च केला आहे. संजय शिंदे यांनी ३ कोटी २८ लाखांचा निधी तर बबनदादा शिंदे यांनी २ कोटी ७६ लाखांचा निधी खर्च केला आहे.
जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले, जनतेच्या मूलभूत तसेच नागरी सुविधांसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. यापुढेही करत राहीन. निधी कमी पडल्यास शासनाकडे पाठपुरावाही केला. जनतेचे प्रश्न सोडविणे हेच माझे कर्तव्य आहे. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, अशी माझी भूमिका आहे.
२०२०-२१ सालाचा तपशील
- आ. संजयमामा शिंदे-३.२८ कोटी
- आ. बबनदादा शिंदे-२.७६ कोटी
- आ. राजेंद्र राऊत-३.७१ कोटी
- आ. यशवंत माने -३.४१ कोटी
- आ. विजयकुमार देशमुख-२.६९ कोटी
- आ. प्रणिती शिंदे-१.९३ कोटी
- आ. सुभाष देशमुख-१.५९ कोटी
- कै.नाना भालके -७९ लाख
- आ. शहाजीबापू पाटील -२.१९कोटी
- आ. राम सातपुते -२.१९ कोटी
- आ. दत्तात्रय सावंत-३३ लाख
- आ. प्रशांत परिचारक-१.९० कोटी
- आ. रणजितसिंह मोहिते-पाटील-१.३१ कोटी
- आ. रामहरी रुपनर-२० लाख
- आ. सचिन कल्याणशेट्टी-१.०४ कोटी
........