कोरोनाच्या संकटामुळे सांगोला आगारातील लांब पल्ल्याची वाहतूक वगळता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा पूर्ण बंद आहे. अशा परिस्थितीतही सांगोला आगारातून दररोज ४५ बस १३ ते १४ हजार कि.मी. धावत आहेत. त्यामधून सरासरी ४ हजार प्रवाशांच्या चढ-उतारामधून आगाराला सुमारे ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नातून सध्या केवळ इंधन खर्च भागविला जात आहे.
रक्षाबंधन सणानिमित्त आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी लांब पल्ल्याच्या बसथांब्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे शनिवार व रविवार एसटीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दैनंदिन प्रवासी चढ-उतारापेक्षा सुमारे अडीच हजार प्रवाशांनी अधिक चढ-उतार झाल्याने आगारास सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
मासिक वेतनाबाबत आगारप्रमुखांची चिंता
सांगोला आगारातील अधिकारी, कर्मचारी उत्पन्न वाढवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. मात्र ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक व कोरोनामुळे लालपरीला पूर्वपदावर येण्यासाठी आणखीन वाट पाहावी लागणार आहे. अशातच सांगोला आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहकांचा जुलै महिन्यातील पगार अद्याप न झाल्यामुळे आगारप्रमुखांना मासिक वेतन कसे अदा करायचे याची चिंता लागून राहिली आहे.
कोट ::::::::::::::::::::::
सांगोला आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीतून दैनंदिन १४ हजार कि.मी.मधून मिळणाऱ्या ४ लाख उत्पन्नातून केवळ इंधन खर्च भागतोय, तर ३ मालवाहतूक बसमधून सरासरी १५ हजार रुपये उत्पन्न मिळते. ग्रामीण भागातील प्रवासी सेवा व विद्यार्थी मासिक पाससह पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक होत नाही, तोपर्यंत एसटी तोट्यात चालणार आहे.
- पांडुरंग शिकारे,
आगारप्रमुख, सांगोला