राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका
By राकेश कदम | Published: April 22, 2024 06:52 PM2024-04-22T18:52:57+5:302024-04-22T18:53:54+5:30
साेलापूर मतदारसंघात तापताेय मराठा आरक्षणाचा विषय; काॅंग्रेसच्या युवा नेत्यांकडून भाजपवर टीका
साेलापूर : साेलापूर लाेकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी घाेषणा भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी केली. महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला. यानंतर भाजप नेत्यांनी गुलाल उधळून जल्लाेष केला. हा कायदा आणि गुलाल समाजाची फसवणूक हाेती, असा आराेप युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनाेद भाेसले यांनी साेमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.
मराठा आरक्षणाच्या विषयावर माेहाेळ तालुक्यातील वडवळ येथे आंदाेलक आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला हाेता. यावरून ग्रामस्थांना तहसीलदारांनी नाेटीसही बजावली हाेती. या विषयावरून आमदार राम सातपुते यांनी तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली हाेती. परंतु, त्यानंतर अनेक गावांमध्ये आरक्षणाच्या विषयावरून दाेन्ही पक्षाच्या उमेदवारांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाहीत ताेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी भूमिका घेतली हाेती.
म्हणजे तुम्ही समाजाला वेड्यात काढले : भाेसले
विनाेद भाेसले म्हणाले, महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्यात आरक्षणाचा कायदा केला. हा कायदा म्हणजे शुध्द फसवणूक हाेती हे आमदार सातपुते यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट हाेते. आता काहीही वक्तव्ये करून स्टंटबाजी करू नका, असा सल्लाही भाेसले यांनी दिला.