सोलापूर/पंढरपूर - शिवसेना नेते संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरुन, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, भाजपला याबाबत काहीच आक्षेप नसल्याचं आठवलेंनी म्हटलं.
खाजगी कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोमवारी पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, ॲड. कीर्तिपाल सर्वगोड, सचिन भोसले आदी उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले, पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी भाजप व एनडीएची सत्ता येणार आहे. राज्य सरकार योग्य काम करीत नाही. देशातील इतर राज्यांतील रस्त्यांच्या तुलनेने आपल्या राज्यातील रस्ते खूप खराब आहेत. रस्त्यांवर खूप खड्डे आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकार दलित समाजावर अन्याय करीत आहे. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला निधी दिला नाही. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ. रमेश कदम यांना शिक्षा झाली आहे, परंतु त्यांची शिक्षा दलित समाजातील तरुणांना देऊ नये. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. रिपाइं सतत मुस्लीम समाजाच्या बाजूनेच असते. परंतु हिजाबवरून शाळेसारख्या पवित्र ठिकाणी धर्म आणू नये, असे खा. आठवले यांनी सांगितले.
राऊतांनी मुलीच्या लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आठवलेंनी मत व्यक्त केले आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत सतत मोदींवर टीका करीत असतात. त्यांच्या या कृतीचा फटका शिवसेनेलाच बसेल. राऊत यांनी त्यांच्या मुलीचे लग्न जसे करायचे तसे करावे. लग्नात पाहिजे तेवढा खर्च करावा, याबाबत भाजपचा काही आक्षेप नसल्याचे खा. आठवले म्हणाले.
ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न सुरू
पँथरला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संघर्ष करणारी संघटना रिपाइंबरोबर असावी, असा कार्यकर्त्यांचा विचार आहे. यामुळे ब्लॅक पँथर चळवळ पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असल्याचे आठवले यांनी सांगितले.