सोलापूर : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच होत असलेल्या घाऊक पक्षांतरामुळे उमेदवारी वाटपाची प्रक्रियाही लक्षवेधी ठरत असून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात अन्य पर्यायावर पडदा टाकत भाजपने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाच उमेदवारी दिली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख सत्ताधारी पक्षाकडून लढणार आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेले दिलीप माने यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांना अखेर उमेदवारी देऊन कॉँग्रेसने तारले आहे. करमाळ्यात सेनेच्या उमेदवारीसाठी रश्मी बागल आणि विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
बार्शी मतदारसंघात शिवसेनेने सोपल यांना उमेदवारी दिली असून भाजपचे राजेंद्र राऊत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर मोहोळ मतदारसंघात यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील मात्र पक्षाने अद्याप त्यांना ए-बी फॉर्म दिलेला नाही. या मतदारसंघात अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणात तुरूंगात असलेले विद्यमान आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला असून तेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. ५ आॅक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिवसेनेच्या करमाळा आणि शहर मध्यच्या उमेदवारीवरून ‘मातोश्री’वर विद्यमान जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत विरुद्ध माजी जिल्हा संपर्क प्रमुख खासदार राहुल शेवाळे असा संघर्ष उभा राहिला आहे. या दोन्ही जागांसंदर्भात बुधवारी ‘मातोश्री’वर पुन्हा बैठका होणार आहेत.
शहर मध्यसाठी जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने तर करमाळ्यासाठी नारायण पाटील आणि रश्मी बागल मुंबईत तळ ठोकून आहेत. शहर मध्यवर सुरुवातीला जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची दावेदारी होती. परंतु, जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना शिवसेनेत आणले. माने यांनी पूर्वीच्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. आक्रमक यंत्रणा, संस्थांचे पाठबळ यामुळे ते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात चांगली लढत देतील, असे तानाजी सावंत यांना वाटते. माजी जिल्हा संपर्क प्रमुख राहुल शेवाळे यांच्या काळात महेश कोठे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. कोठे यांनी २०१४ साली चांगली लढत दिली होती. या भागात त्यांची मतपेढी आहे. नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. पक्षाने त्यांना तयारी करायला सांगितल्याने त्यांनाच उमेदवारी द्यावी, असे खासदार राहुल शेवाळे यांना वाटते. विशेष म्हणजे शेवाळे यांच्या बाजूने खासदार संजय राऊत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली आहे.
करमाळ्यात बेरजेच्या राजकारणात नारायण पाटील कमी पडू शकतील, असा दावा करून सावंत यांनी बागल यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. डॉ. सावंत यांनी उमेदवारी मिळवून देऊ, या आश्वासनावरच बागल यांना शिवसेनेत आणले आहे. पाटील यांचा राहुल शेवाळे यांच्याशी पूर्वीपासून संपर्क आहे. शेवाळे मुंबईतील कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे पाटील दुपारपर्यंत त्यांची वाट पाहत मातोश्रीबाहेर थांबले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला खासदार राहुल शेवाळे, आमदार नारायण पाटील, तालुका प्रमुख महेश चिवटे यांनी ठाकरे यांची भेट घेतली.
तानाजी सावंत यांना दूर का ठेवले? - माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी तानाजी सावंत यांनी मंगळवारी पुण्यात बैठक बोलावली होती. त्यांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी करमाळा आणि शहर मध्यसाठी बैठक घेतली. राहुल शेवाळे यांनी करमाळ्यातील उमेदवारीसाठी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्यासोबत बुधवारी दुपारी १ वाजता बैठक घ्यावी. या बैठकीनंतर काय ठरेल, त्याचा निरोप मला द्यावा. त्यानुसार मी उमेदवारी जाहीर करेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शहर मध्यच्या उमेदवारीबाबत बुधवारी निर्णय होणार आहे.