संताजी शिंदे, सोलापूर:
वाट धरिता पंढरीची, चिंता हारे संसाराचीऐसे कोठे नसे पायी, धुंडीता ब्रह्मांड पाहीपाहिले शोधुनी, तिर्थे आणि देवस्थानीमोक्ष भक्ती पाही, सेना म्हणे लागा पायी,
अशी भावना व्यक्त करीत शेगावच्या राणाची पालखी गुरूवारी सकाळी सोलापूरात दाखल झाली. फुलांच्या पाकळ्या, रांगोळीने शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथे पालखीचे आमगन झाले. रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी पालखी हिप्परगा मार्गे शहरात दाखल झाली. वारकरी हातात भगवे झेंडे घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने शहरात दाखल होत होते. पालखीच्या समोरील भागात टाळकरी तल्लीन होऊन नृत्य करीत होते. सकाळी १० वाजता रूपा भवानी मंदिर चौक येथे पालखीचे आगमन झाले. आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी मान्यवरांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.
पालखी सोबत ७०० वारकरी मंडळी
पालखी सोबत ७०० वारकरी असून, त्यामध्ये टाळधारी व झेंडाधाऱ्यांचा समावेश आहे. पालखीत तीन अश्व व तीन वाहनांचा समावेश आहे. वाकऱ्यांकरीता ॲम्ब्युलन्स गाडी, डॉक्टर यांचाही समावेश असून औषधोपचाराची सोयही करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला एकच सरकार मिळू दे : प्रणिती शिंदे
दरवर्षी पालखी ही सोलापूरात येत असते, यंदा मी गजानन महाराजांना सोलापूरवर दुष्काळी परस्थिती आहे, ते संकट दुर होऊ दे. महाराष्ट्रात लवकर पाऊस येऊ दे, सर्व क्षेत्रातील कामगारांची इच्छा पूर्ण होऊ दे. पिकाला पाणी मिळू दे अन भविष्यात महाराष्ट्राला एक सरकार मिळू दे अशी मागणी केल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आम्हाला लवकर पाऊस दे : शितल तेली-उगले
पालखीचा दोन दिवस मुक्काम सोलापुरात असतो, दरम्यानच्या कालावधीतील मार्गावरील साफसफाई, फायर ब्रिगेड, डॉक्टर, ग्राऊंची तयारी इतर काही बारीक सारीक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. पालखीचा दोन दिवसाचा मुक्काम सुखकर हाेईल. भक्तीचा आणि भक्तांच्या दोन्ही नद्या पंढरपूरला जाऊन मिळणार आहे. लवकर आम्हाला पाऊस दे अशी मागणी गजानन महाराज व श्री विठ्ठलाकडे केल्याचे महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.