- मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा सकाळी सात वाजता ब्रह्मपुरी (ता मंगळवेढा) येथे सोमवारी दाखल झाला. ब्रह्मपुरी येथे पालखी दाखल होताच नागरिकांनी या पालखीचे उत्साहाने स्वागत केले.
प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारकऱ्यांची रांग, टाळ-मृदंगाचा गजर आणि पावसाळी वातावरणात आनंदाला आलेली भरती असे मनमोहक दृश्य ग्रामस्थांना अनुभवयास मिळाले. पालखी सोहळा प्रवेश करताच त्याचे स्वागत दामाजी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, युवक नेते संजय पाटील यांनी सहकुटुंब केले. यावेळी पोलीस निरीक्षक नयोमी साटम ह्या वारकऱ्यांसोबत पायी चालत होत्या, त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जालिंदर व्हनूटगी, भारत पाटील,दामाजी शुगर संचालक दयानंद सोनगे, भारत बेदरे, संतोष सोनगे, ग्रामसेवक संजय शिंदे, आण्णासाहेब पाटील, सिद्धेश्वर कोकरे, प्रमोद पुजारी, राजू हवालदार, हेमंत निकम, सुनील पाटील, सत्तार इनामदार, उदयसिंह पाटील , उल्हास पाटील, भूपाळ पाटील, बजरंग पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री संत गजानन महाराजांचा जयजयकार करीत टाळ मृदंगाच्या गजरात, अश्व, रथ, मेना, भालदार, चोपदार, अशा राजवैभवी थाटात या पायदळ वारीत शेकडो टाळकरी, पताकाधारी वारकरी सहभागी झाले आहेत. टाळ मृदंगाचा निनाद, टाळकऱ्यांच्या ‘गण गण गणात बोते'च्या गजराने ब्रह्मपुरी पंचक्रोशीत मंगलमय वातावरण पसरले होते.