सोलापूर : हल्ली कोण कधी आणि केव्हा काय करेल याचा नेम नाही. आता हेच बघा ना शनिवारी सोलापुरात विविध भागात धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी सुरु असताना उत्तर कसब्यातील पोरांनी चक्क जिवंत मुलाला शिर्डीवर झोपून रंगोत्सव करत अंत्ययात्रा काढली. ‘राम नाम सत्य है’ असा नारा देत रंगपंचमीचा आनंद लुटला.
रंगपंचमीचा उत्सव तसा सोलापुरात होळीपासून पाच दिवस साजरा केला जातो. रंगपंचमीला विशेष उत्साह दिसून येतो. सोलापूर बहुभाषिक शहर असल्यामुळे येथे अनेक परंपरा या निमित्ताने जपल्या जातात. राजपूत समाज कोरडा रंगोत्सव साजरा करतो. लोधी समाजात रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाते. पंढरीत पांडुरंगाच्या साक्षीनं रंगोत्सव साजरा होतो. उत्तर कसब्यात मुलांनी शनिवारी दुपारच्यावेळी अगदी मजा म्हणून रंगोत्सव सुरू असताना उपस्थितांपैकी एकाच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी चक्क तिरडी बांधून त्यावर जिवंत मुलाला झोपवलं. काही अंतरावर अंत्ययात्रा काढण्यात आली, ‘राम नाम सत्य है’ असा नारा देत हास्यकल्लोळामध्ये सारेच बुडाले.
केवळ मनोरंजनाचा हेतू
हा सारा प्रकार चेष्टेमध्ये मनोरंजन करण्याच्या हेतूने केला. यात कोणाला दुखावण्याचा हेतू नसल्याचे या मुलांनी सांगितले. त्यांच्यापैकी एकानेही नाव न सांगता पुन्हा असे प्रकार करणार नाही अशी कबुली दिली. सोलापुरात उत्तर कसबा परिसरातील पोरांनी शनिवारी रंगपंचमी साजरी करताना चेष्टेमध्ये जिवंत मुलाची अंत्ययात्रा काढली.