मंगळवेढा : धुळे येथील राईनपाडा हत्याकांडातील त्या मृतांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत चौघांच्या अस्थी कपड्यामध्ये बांधून झाडाला लटकविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नुकताच त्या मृत चौघांचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे़
धुळे येथील राईनपाडा परिसरात खवे व मानेवाडी येथील भारत माळवे, भारत भोसले, दादा भोसले, आप्पासाहेब शिंदे व राजेंद्र भोसले हे पाच जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता तेथील ग्रामस्थांनी मुले पळविणारी टोळी असल्याचा समज करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. नुकताच या मयतांचा त्यांच्या गावी दशक्रिया विधी पार पडला. दशक्रिया विधीला अस्थीचे नदीच्या पात्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र या कुटुंबीयांनी शासनाने घोषित केलेली १० लाखांची आर्थिक मदत, घरकुल, जमीन, ओळखपत्र, शासकीय नोकरी आदींची पूर्तता झाल्याशिवाय अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़
त्या मृतदेहांच्या अस्थी एका कपड्यामध्ये गुंडाळून लिंबाच्या झाडाला लटकावल्याचे भोसले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. भारत भोसले व दादा भोसले हे दोघे सख्खे भाऊ या घटनेत मयत झाल्याने त्या कुटुंबावर आसमानी संकट कोसळले असून, घरातील कर्ते पुरूष मृृृत पावल्याने लहान मुलांचे शिक्षण व कुटुंब कसे चालवायचे हा ज्वलंत प्रश्न त्या मृतांच्या पत्नीपुढे उभा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण होती आली तरी अद्यापही काही समाज भटकंतीचे जीवन जगत निसर्गाशी सामना करीत आहेत़ या समाजाकडे उन्नतीसाठी व्यवसाय असता तर हा समाज भटकंती करीत गेला नसता व त्यांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया खवे व मानेवाडी गावातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे़
या कुटुंबांना तातडीने मदत निधी मिळावी यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांकडून मागणी होत आहे़ लवकरच न्याय मिळले असे सांगितले़
रेशनकार्डही नाहीत !- तालुक्यात जवळपास १० हजार डवरी-गोसावी समाजबांधव आहेत. कचरेवाडी, निंबोणी, खुपसंगी, जित्ती, मारोळी, लवंगी, सलगर (खु), महमदाबाद (हु), गोणेवाडी, पडोळकरवाडी, मानेवाडी, पाटखळ, जुनोनी, येळगी, रड्डे, सिध्दापूर, शिरनांदगी व मंगळवेढा शहरातील धर्मगाव रस्ता आदी ठिकाणी हा समाज वास्तव्यास आहे. हा समाज भटकंती जीवन जगत असल्यामुळे आपल्या लहान मुलाबाळांना सोबत नेत आहेत़ परिणामी मुलांचे शिक्षण बुडवून हा समाज शिक्षणापासून वंचित राहत आहे. अपूर्ण शिक्षणामुळे नोकरीही भेटू शकत नाही. पिढ्यान् पिढ्या आपला पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत आहेत. या भटक्या लोकांना रेशनकार्ड नसल्यामुळे शासनाकडील सवलतीतील धान्य व रॉकेलही मिळू शकत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत.