सोलापूर : माढा लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबीयांच्या नावे १०० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था,कंपन्या, शेती, वाहनांसाठी ८९ कोटींचे त्यांनी कर्ज काढले असून, आयकर विभागाची ५६ लाख ७८ हजारांची थकबाकी आहे.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर (वय ४२) हे सातारा जिल्ह्यातील निंभोरे येथील रहिवासी आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण दिलेले आहे. स्वत:बरोबरच पत्नी जिजामाला, मुले ताराराजे व इंद्रराजे यांच्या नावे असलेल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
सन २०१४ मध्ये त्यांचे उत्पन्न ६१ लाख ५३ हजार इतके होते तर आता २०१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ३ कोटी ६४ लाखांवर गेले आहे. रणजितसिंह यांच्या नावे इर्टिगा, टाटा सुमो:३, इनोव्हा, फॉर्च्युनर, बोलेरो, सुमो ग्रॅन्डे तर पत्नीच्या नावे मर्सिडीज, सुमो अशी वाहने आहेत. रणजितसिंह यांच्या नावे, शेतजमीन, निवास व कमर्शियल इमारती, कारखाने अशी ८४ कोटी ६ लाखांची संपत्ती आहे.
पत्नीच्या नावे १0 कोटी १२ लाख तर मुलगा ताराराजे याच्या नावे ३ कोटी २६ लाख तर इंद्रराजे याच्या नावे ३ कोटी २४ लाखांची संपत्ती आहे. विविध कंपन्या व शेती विकासासाठी घेतलेल्या कर्जामध्ये रणजितसिंह यांच्या नावावर ६९ कोटी २६ लाख तर पत्नीच्या नावावर १९ कोटी ८0 लाख असे ८९ कोटी ६ लाख इतके कर्ज आहे. याचबरोबर विविध बँकांमध्ये डिपॉझिट, कारखान्यांचे शेअर्स, विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
भुगाव-मुळशी, दलवडी, गाडेवाडी, निकंबवाडी, जाधववाडी, उपळवे, ठाकुरकी येथे शेतजमीन आहे. तसेच खर्डेवाडी, निकंबवाडी, उपळवे, झिरापवाडी येथे नॉनअॅग्री जमीन विकसित केली आहे. फलटण येथे मेटकरी कॉम्प्लेक्स, सिद्धिविनायक अपार्टमेंट जाधववाडी, फलटण येथे अपार्टमेंट, पुण्यात धनकवाडी येथे घर, फलटणमधील लक्ष्मीनगरात बंगला आहे.
यामध्ये रणजितसिंह यांच्या नावावरील जमीन व बांधकामाची किंमत ५ कोटी ३८ लाख, पत्नीच्या नावे: ७ कोटी २६ लाख इतकी होत आहे.
११७ तोळे सोनेरणजितसिंह व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ११७ तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत. यात रणजितसिंह यांच्याकडे ७१ तोळ्याचे (किंमत: २३ लाख ३२ हजार) तर पत्नीकडे ४६ तोळ्याचे ( १५ लाख ११ हजार) दागिने आहेत. दागिने कोणकोणते आहेत, चांदीच्या दागिन्याबाबत मात्र त्यांनी तपशील दिलेला नाही. त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल असल्याचा त्यांनी उल्लेख केला असून, एका खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.