सोलापूर : महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने एक डाव व ६९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात अंकित बावणेहा सामनावीर ठरला. महाराष्ट्र संघाने बोनस गुणासह विजयी सुरुवात केली.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या ४ बाद ८५ वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली, परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही. सिद्धेश वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला. किशन संघा १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही, एकापाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परतत गेले.
मणिपूरचा संपूर्ण संघ ५५.२ षटकात सर्वबाद ११४ धावा करू शकला. मणिपूर कडून सर्वाधिक नितेश २६ धावा, तर जॉन्सन याने २५ धावांचे योगदान दिले.
महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने ५.२ षटक टाकत अवघ्या १० धावा देत मणिपूर चे ४ गडी बाद केले. त्याला हितेश वाळुंज याने ३१ धावा देत ३ बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवला.