सोलापूर : माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून मात्र गनिमी कावा खेळण्यात आल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर सहकार मंत्र्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा घडविण्यात आली. त्याचवेळी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपाची उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ नेते शिक्कामोर्तबच्या तयारीला लागले. निंबाळकर हे सध्या सातारा जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
संजय शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर भाजपाने संजयमामांच्या महाआघाडीत भेद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाआघाडीतील नेते फलटणच्या रणजितसिंह निंबाळकरांचे नाव अकस्मातपणे पुढे आले आहे. महाआघाडीत फूट पडली तर त्याचा सर्वाधिक फायदा भाजपालाच होऊ शकतो, हे ओळखून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निंबाळकर गटाशी चर्चा सुरू केली.
नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर पक्षप्रवेश अन् उमेदवारी घोषणा या दोन्ही गोष्टी येत्या दोन दिवसांत मुंबईत होतील, असे सूचित करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि नुकतेच भाजपावासी झालेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. माढ्यातील राजकीय कार्यकर्त्यांच्या मते माढ्यात रणजितदादा विरुद्ध संजयमामा अशीच लढत होईल, अशी चिन्हे होती. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असली तरी सहकारमंत्री देशमुख गटातील पदाधिकाºयांच्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितदादांना कोणताही शब्द दिला नाही.
विशेष म्हणजे मोहिते-पाटलांनीही उमेदवारीसाठी हट्ट धरलेला नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास मैैदानात उतरण्याची तयारी दाखविली होती. रणजितदादांच्या भाजपा प्रवेशावेळी झालेल्या खासगी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुख हेच माढ्यातील उमेदवार असतील, असे भाजपा पदाधिकाºयांना सांगितले होते. त्यावर काही पदाधिकाºयांनी हवे तर रोहन देशमुख यांना उमेदवारी द्या, पण सुभाषबापूंना सोलापुरातच राहू द्या, अशी मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही.
कोण आहेत सातारा जिल्ह्यातील रणजितसिंह ?फलटण येथील रणजितसिंह निंबाळकर हे सध्या सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांचे वडील हिंदुराव निंबाळकर हे सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले होते. फलटण तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर यांचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे संजयमामा शिंदे यांच्या महाआघाडीतही ते आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत सक्रिय होते.
फलटणचे नेते सोलापुरात...- शुक्रवारी लोकमंगल मल्टिस्टेटचे प्रमुख रोहन सुभाष देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यामुळे माढ्यात नव्या नावाची चर्चा सुरू केली जात असतानाच पडद्यामागे मात्र निंबाळकरांना भाजपाची उमेदवारी निश्चित करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. यासाठी रणजितसिंह निंबाळकर यांच्या गटाचे प्रमुख सहकारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना सोलापुरात भेटले.