सोलापूर : मोहोळ येथील मोहिते-पाटील समर्थक तथा जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक संतोष गायकवाड यांच्या निवासस्थानी रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आज आवर्जून हजेरी लावली. यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे काही निवडक पदाधिकारी उपस्थित असले तरी भाजपमधील मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी मात्र याठिकाणी अनुपस्थित असल्याने हे स्नेहभोजन भाजप समर्थकांसाठी होते की मोहिते-पाटील समर्थकांसाठी होते याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
या स्नेहभोजनास राष्ट्रवादीमधील काही दिग्गज नेते देखील उपस्थित होते. त्यामध्ये मोहोळचे माजी प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारसकर यांचा समावेश आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अजयदादा कुर्डे, गणेश भोसले,रामदास झेंडगे इत्यादीसह भाजप आणि मोहिते- पाटील गटाचे समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.
संघटना बांधणी ?- रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मोहोळ शहरांमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दहा वर्षांपूर्वी मोहिते-पाटील गटाने मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात देखील समर्थकांचे जाळे निर्माण करत विजय -प्रताप युवा मंचच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी संपर्क कायम ठेवला होता. भाजपच्या या सुप्त संघटना बांधणीची सुरुवात मोहोळ शहरातूनच झाल्याची चर्चा शहर व तालुक्यात होत आहे.