पंढरपूर : पंढरपूर हे वारकरी भाविकांचे माहेर आहे़ अध्यात्माचे केंद्र असलेल्या पंढरीत विकासकामांची गंगा वाहत राहणार आहे. यातच पंढरपुरात होत असलेल्या नामसंकीर्तन सभागृह व अन्य विकासकामांमुळे या भूवैकुंठ पंढरीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे़ नामसंकीर्तन सभागृह हे सद्विचारांचे प्रेरणा देणारे केंद्र होईल, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले.
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत पंढरपूर शहर विस्तारित भागात भुयारी गटार योजनेचा टप्पा क्र. ३, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत विविध विकासकामे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सांगोला रोड व इसबावी येथे प्रत्येकी १० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे व वितरण नलिका टाकणे आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नामसंकीर्तन सभागृहाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी आ़ सुधाकरपंत परिचारक होते़
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ प्रशांत परिचारक, आ़ दत्तात्रय सावंत, नगराध्यक्षा साधना भोसले, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, पं़ स़ सभापती दिनकर नाईकनवरे, बाजार समिती सभापती दिलीप घाडगे, जि़ प़ सदस्य वसंतराव देशमुख, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़रणजित पाटील म्हणाले, पंढरपूरचे माहात्म्य वेगळे आहे़ विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणाºयांना नवीन ऊर्जा मिळते. दर्शनासाठी येणाºया लाखो भाविकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. या वारकरी भाविकांना पंढरीत आल्यानंतर स्वच्छ पाणी, आरोग्य व अन्य चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनामार्फत अनेक विकासकामे केली जात आहेत. पंढरपुरात विकासकामांची गंगा अशीच चालू राहणार आहे.
मात्र सर्व कामे नियोजित वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे़ पंढरपूर शहराचा अमृत योजनेत जरी समावेश नसला तरी या शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुम्ही विविध योजनांचे प्रस्ताव सादर करा, निधी कमी पडू देणार नाही़ वारकरी संप्रदायाबरोबरच येथील कला रसिकांसाठी नामसंकीर्तन सभागृह पर्वणी ठरणार आहे. राज्य शासनाने नामसंकीर्तन सभागृहासाठी अर्थसंकल्पात ४० कोटींची तरतूद केली असून १० कोटी नगरपालिकेस दिले आहेत. नामसंकीर्तन सभागृहाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, असे नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले़
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. येथे येणारा वारकरी हा सामान्य असून त्याला सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन आग्रही आहे. त्यामुळेच पंढरपूर क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री वारीसाठी येणाºया भाविकांना चांगले रस्ते मिळावेत, यासाठी पंढरपूरकडे येणारे मुख्य सहा मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
प्रास्ताविकात आ़ प्रशांत परिचारक यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला़ आभार नगराध्यक्षा साधना भोसले यांनी मानले़
मंदिर समितीने पुढाकार घ्यावा़....- राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी राज्यात कौशल्य विकासाची केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकासाचे केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्यास त्यांच्या प्रस्तावास राज्य शासनामार्फत प्राधान्य दिले जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले़
थोडा निधी कराडलाही द्या! - भाविकांना दिलासा मिळेल, अशी विकासकामे पंढरपुरात सुरू आहेत़ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी येतो़ राज्यातील सर्वाधिक विकासकामे पंढरपूर नगरपरिषदेंतर्गत सुरू आहेत़ त्यामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून इतका नको, पण थोडा तरी निधी कराडलाही द्यावा, अशी विनंती डॉ़ अतुल भोसले यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली़