सोलापूर - युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला.
लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली। असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.