मोहिते-पाटील पिता-पूत्रांवर भाजपने या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळापासून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समाधान आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात गेल्या आठ दिवसांपासून दररोज स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या सभा, कॉर्नर बैठका, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील अग्रभागी होते. यादरम्यानच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली. त्यानंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
त्यामुळे त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपली टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली असून, आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ची टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.